ठाण्यात अजेय संस्थेच्यावतीने रंगणार मराठी राजभाषा दिन उत्सव
ठाणे (दिपक मांडवकर)मराठी राजभाषा दिनाचा उत्सव हा केवळ प्रचलित बोली मराठीचा नाही तर ज्या ज्या बोलींनी संपूर्ण मराठी तयार होते तिचा उत्सव. ठाण्यामधे अजेय संस्था दर वर्षी ह्या उत्सवानिमित्त ' शब्दसेल्फी ' ह्या नावपासूनच आगळ्यावेगळ्या अशा कार्यक्रमाचे सादरीकरण गेली चार वर्षे करत आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष. पाचव्या वर्षीचा शब्दसेल्फी ' वैश्विक मराठी कविता ' ह्या रुपात सादर होत आहे. कविता हा तसा खाजगी प्रकार. पण मराठी साहित्यात अशा ही कविता आहेत ज्या विश्वात घडणाऱ्या घटनांशी, त्यातील माणूस म्हणून बाहेर येणाऱ्या भावनांशी आज ही तितक्याच चपखल जोडल्या जातात. म्हणून त्या वैश्विक ठरतात. याच अभ्यासावर आणि विश्वासावर शब्दसेल्फी : वैश्विक मराठी कविता हे स्वरूप तयार झाले.
ही मूळ संकल्पना,कविता संकलन, दिग्दर्शन हे लेखक दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी ह्यांची असून निर्माता गौरव संभूस आणि अजेय टीम हा सोहळा बुधवार ४ मार्च रात्री ८ :३० वा. रसिक प्रेक्षकांसमोर गडकरी रंगायतन इथे सादर करत आहेत.
मराठी कवितांना वेदकाळापासून ते आत्ता च्या पिढी पर्यंत वैश्विक कवितांची मोठी परंपरा आहे. वैश्विक पैलू असणाऱ्या पंच्याहत्तर कविता या कार्यक्रमासाठी निवडलेल्या आहेत. यातील साठ टक्के कविता ह्या निवेदनात म्हणजेच निरुपणात सामील केल्या आहेत. चाळीस टक्के कविता ह्या रंगमंचावर आणि रजत पाटावर उलगडणार आहेत.
बा.सी.मर्ढेकर, ग्रेस, कुसुमाग्रज, दिलीप चित्रे, विं.दा.करंदीकर, मल्लिका अमरशेख, मनोहर ओक, नारायण सुर्वे, शंकर वैद्य, आरती प्रभू, सुरेश भट, कवी अनिल, मंगेश पाडगावकर, बालकवी, नीरजा, सतीश काळसेकर,प्रिया जामकर, हेमंत दिवटे, यशवंत मनोहर, इंदिरा संत, सौमित्र, रोशेल पातेकर, आदित्य दवणे,प्रज्ञा दया पवार, डॉ.अरुणा ढेरे,शांता शेळके, नामदेव ढसाळ,तुलसी परब,वसंर आबाजी डहाके ह्या सर्व कवींच्या कवितांबरोबर संतकाव्याचा ही समावेश कार्यक्रमात पाहायला मिळाले.
कविता वाचन सुरू असताना त्यावर घडणारे (मीमे)म्हणजेच काव्य मूकनाट्य, कविता वाचन सुरू असताना त्यावर घडणारे छोटे नाट्य म्हणजेच काव्यांकिका, एकामागोमाग सादर होणारी कवितांची साखळी म्हणजेच काव्य शृंखला, काव्यवाचन, पाच कवितांवर आजचे विषय मांडणारे पाच लघुचित्रपट म्हणजेच काव्यचित्रपट अशा वैविध्यपूर्ण स्वरूपात शब्दसेल्फी सादर केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा