गृहनिर्माण सोसायटयांमध्ये,पार्कींग एरिया,टेरेसवर 5 पेक्षाजास्त नागरिक एकत्र आल्यास कारवाई-गृहसंकुले, गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महापालिकेची नियमावली


उल्लंघन झालयास सोसायटीचे सचिव, अध्यक्षावर होणार फौजदारी गुन्हा दाखल.


ठाणे ( प्रतिनिधी ) विषाणूचा कोविड -१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ लागू असून शहरातील गृहसंकुले, सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, पार्कींग एरिया, टेरेस आदी ठिकाणी कोणत्याही कारणास्तव 5 पेक्षा जास्त नागरिक एकत्र जमल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.  दरमान्य गृहनिर्माण सोसायटयांचे अध्यक्ष आणि सचिव यांनी कोविड - १९ चा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून या नियमावलीचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
    महाराष्ट्र शासनाच्या १७ एप्रिल, २०२० चे आदेशान्वये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना अत्यावश्यक, अत्यंत निकडीचे कारण वगळता अन्य कारणासाठी घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम १४४ अन्वये विविध कारणासाठी पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी एकत्र येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.


परंतु काही गृहनिर्माण सोसायटयांमध्ये काही नागरिक सोसायटीच्या अंतर्गत भागामध्ये, कॉमन एरियामध्ये, पार्कीग एरियामध्ये तसेच सोसायटीच्या गच्चीवर खेळाचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन किंवा अन्य विविध कारणास्तव एकत्रित येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी कोविड - १९ चा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असून पॉझिटीव्ह रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अडचण निर्माण होवून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता आहे.


 त्यामुळे शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायटयांचे अध्यक्ष आणि सचिव यांनी कोविड - १९ चा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष, सचिव यांनी शासन आदेशातील तरतुदी विचारात घेऊन सोसायटी अंतर्गत कोविड - १९ चा संसर्ग पसरण्यास प्रतिबंध करण्यासंदर्भात सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींच्या वर्तणूकीसाठी सोसायटीचा कॉमन एरिया, पाकींग एरिया व अन्य पॅसेज, गच्चीमध्ये मॉर्निग वॉक, ईव्हिनींग वॉकसाठी कोणीही व्यक्ती अत्यावश्यक कारण वगळता फिरणार नाही, घराबाहेर पडणार नाही अशी नियमावली प्रसिद्ध करावी. सोसायटीच्या कोणत्याही रहिवाशांस अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना देखिल मास्कचा वापर करणे हितावह राहील, सोसायटीच्या कोणत्याही सदस्यांने, रहिवाशाने सादर करण्यात आलेल्या नियमावलीमधील तरतुदीचा भंग केल्यास त्यांच्यावर प्रथम दंडात्मक कारवाई करण्यात यावी. दुसऱ्या वेळीही अशी व्यक्ती कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्याचे आढळून आल्यास त्यांचेविरुध्द नजिकच्या पोलीस ठाण्यामध्ये अध्यक्ष तसेच सचिव यांनी भारतीय दंड विधान कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सोसायटीमध्ये असलेल्या नर्सिग होम, दवाखाने, औषधे दुकाने याबाबत सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करुन, कामकाज करु देणेबाबत मुभा देण्यात यावी, सोसायटीमधील एखादा रहिवाशी कोरोना बाधित झालेचे चाचणीमध्ये समोर आल्यास सदर रहिवाश्यांच्या कुटूंबियास कोणतीही असामाजिक वागणूक दिली जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.


    अध्यक्ष, सचिव यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेच्यावतीने सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांचेविरुध्द फौजदारी गुन्हा तसेच त्यांचे सोसायटीचे अध्यक्ष, सचिव पदावर काम करण्याबाबतच्या अनर्हतेबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.


टिप्पण्या