कोरोना लढा सन्मान हा भडे गावाच्या ऐक्याचा विजय - सुहास वाडेकर
कोरोना योद्धा भडे गावाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष सन्मान आणि पुरस्कार
लांजा (दिपक मांडवकर) सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीच्या वतीने भडे गावाला जाहीर करण्यात आलेला कोरोना लढा सन्मान पुरस्कार हा ग्रामपंचायत, ग्राम कृती दल यांसह समस्त भडे नागरिकांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी केलेल्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन कोरोना लढा सन्मान विजयोत्सव कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुहास वाडेकर यांनी भडे येथे केले.
पंचायत राज मधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा टप्पा असलेल्या मिनी मंत्रालय ग्रामपंचायत मध्ये काम करताना इतरांना नकारात्मक बोलायचे अगोदर त्यांच्या जागी उभे राहून बघा, एकमेकांनी आपल्याला दुसऱ्याच्या स्थानी ठेवून पहा, नागरिकानी लोकांना हवेहवेसे सदस्य निवडा, वाईट कोणीच नाही फक्त आपल्या पेक्षा दुसरा वेगळा आहे याची सतत जाणीव ठेवा, व्यक्ती वाईट नाहीत वेगळ्या आहेत त्यामुळे इतरांना आपणासारखे नव्हे तर आपलेसे होण्याचा प्रयत्न करा, कोणाला शिकवण्याऐवजी सात्विकता, चांगले विचार यांनी कायम चार्ज करावे अशा प्रकारचे प्रेरणादायी विचार त्यांनी निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत भडे च्यावतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे लांजा उपतालुकाप्रमुख सुरेशजी करंबेळे, उपविभाग प्रमुख प्रदीप गार्डी, सरपंच सुधीर तेंडुलकर, उपसरपंच सदिच्छा नवाथे, माजी सरपंच संजीवकुमार राऊत, तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव आग्रे, भडे ग्राम सेवा संघ मुंबई अध्यक्ष दत्ताराम राऊत, माजी पोलीस पाटील भिकाजी भडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृषाली लोखंडे, शिवसैनिक लक्ष्मण तांबे यांसह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान व्हिजन भडे यावर बोलताना सुसज्ज ग्रामपंचायत, वाचनालय निर्मिती, स्पर्धा परीक्षा सक्षमीकरण, कातळशिल्पे संवर्धन, रोजगार निर्मिती, पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, युवक संघटन मेळावे आदि कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात यावे तसेच भविष्यातील वाटचाल करताना सर्वांना सोबत घेऊनच चालण्याचे आवाहन सुहास वाडेकर यांनी केले.
लांजा तालुक्यात कोरोना लढा सन्मान पुरस्कारात द्वितीय क्रमांक पटकावून पालकमंत्री अनिल परब, जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार पटकावणाऱ्या भडे ग्रामपंचायतीचे कौतुक करताना सुरेश करंबेळे यांनी सरपंचासह समस्त भडे परिवाराला तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.भडे ग्राम सेवा संघाचे अध्यक्ष दत्ताराम राऊत यांनी ग्रामपंचायतीने चाकरमान्यांना जी सौहार्दपूर्ण वागणूक दिली, सरपंच सुधीर तेंडुलकर यांनी जो विश्वास आणि आपुलकी दाखवली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या ग्रामपंचायतीला मिळालेला पुरस्कार केवळ गाव वासियांच्या सहकार्यानेच मिळाल्याचे प्रतिपादन सरपंच सुधीर तेंडुलकर यानी व्यक्त केले. व्हिजन भडे अंतर्गत कार्य करताना गावाचा अधिकाधिक विकास कसा होईल, यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन त्यांनी दिले. युवापिढीने स्पर्धा परीक्षांचा ध्यास घ्यावा, याकरिता विशेष नियोजन करण्याचे त्यानी सूतोवाच केले. कोरोनासोबत लढताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे त्यांनी विशेष ऋण व्यक्त केले. आपण हा पुरस्कार कोरोना लढ्यात हातात हात घालून काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या सहकार्य शील मनोबलाला अर्पण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अतिथी आदर्श शिक्षक सुहास वाडेकर यांनी व्यक्त केलेल्या मनोदयाला आपल्या उर्वरित कालावधीत निश्चितच पूर्णत्वास नेणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.यानिमित्ताने पत्रकार बांधवानाही त्यांनी विशेष धन्यवाद दिले.
ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य संजय खर्डे, सुप्रिया
गितये , राजेश मयेकर, जयवंती खर्डे, अक्षता चौगुले, ग्रामसेवक स्वाती महाजन, कर्मचारी शांताराम दळवी, गीतानंद बोरकर, आदर्श शाळा भडे क्र १ मुख्याध्यापक अक्षता रहाटे आणि शिक्षक वृंद यांचे प्रमुख सहकार्य लाभले. गाववासीयांच्या एकीच्या बळातून मिळालेल्या पुरस्काराचे कौतुक म्हणून ज्येष्ठ ग्रामस्थ तात्याकाका तेंडुलकर परिवाराने खास मुंबईहून अल्पहाराची सुविधा करून वेगळा मापदंड निर्माण केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा