रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोना निदान सेंटर सज्ज


रत्नागिरी (हृषिकेश विश्वनाथ सावंत):- जिल्ह्यात कोविड -१९ चे निदान सेंटर सुरु करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यात कोवीड केअर सेंटर सुरु आहेत. तसेच ४ डिसीएच आणि २ डिसीएचसी सुरु आहेत.जिल्ह्यातील सर्व जनतेला कोविड मध्ये सहज सुलभतेने निदान करणेत यावे याकरिता जिल्ह्यात डायग्नोस्टिक कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. त्याकरीता शहरी प्रा. आ. केंद्र झाडगांव, मेस्त्री हायस्कुल रत्नागिरी तसेच चिपळूण मधील नगर परिषद दवाखाना, उर्दुशाळा राजीवडा येथे सुरु करण्यात येत आहे. 

जर कोणाला सर्दी, ताप, खोकला, डोळे येणे, श्वास घेणेस त्रास होणे, ओठ व जीभ निळसर पडणे, भूक न लागणे, जीभेला कुठली चव नसणे, उशीरा कळणे ( Mental Confusion ), छातीत दुखणे यापैकी कुठलेही लक्षण दिसले तर त्वरीत या कोवीड निदान सेंटरमध्ये चाचणी करणेस जाणे आवश्यक आहे. या सेंटरमध्ये लक्षणे आलेल्या व्यक्तींना प्रथमोपचार केले जातात व उपचार केल्यावर प्रतिसाद नसेल तर कोवीडची चाचणी केली जाते. जेणेकरुन लवकरात लवकर तपासणी होईल व लवकर उपचार सुरु होतील. जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आवाहन केले की लवकर निदान व लवकर उपचार यामुळे कोवीड -१९ रुग्णांपासून इतरांना आजार पसरणार नाही. त्यामुळे सदर कोवीड निदान सेंटरचा सर्वानी लाभ घ्यावा. तसेच अलगीकरण व विलगीकरण केलेल्या व्यक्तीनी स्वजबाबदारीने घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

   

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी असे आवाहन केले की, सामाजिक अंतर व प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे लक्षणे दिसल्यास घरी न बसता त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलापूरकर यांनी सांगितले की उपरोक्त लक्षणे आढळल्यास पहिल्या दिवशीच प्रत्येकाने दवाखान्यात जावे. तसेच डॉक्टर बदलू नयेत जेणेकरुन त्या डॉक्टरांना लक्षात येईल की आपल्याला औषधांना प्रतिसाद नाही. बरे वाटत नाही म्हणुन डॉक्टर बदलले तर निदान उशीरा होते. तसेच लवकर चाचणी करुन घेणे. या आजारामध्ये प्रतिकारशक्तीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याप्रमाणे प्रतिकारशक्ती वाढवण्यास नियमित व्यायाम, संतुलीत व पोषक आहार, फळे, प्रथिने, जीवनसत्वे यांचा आहारामध्ये समावेश करावा. नियमित योगासने प्राणायाम पण आवश्यक आहे. घाबरु नका पण दक्षता घ्या. तसेच अलगीकरण व विलगीकरण केलेल्या व्यक्तीनी स्वजबाबदारीने घरा बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या