आता आस लागलेय मंदिरे उघडण्याची!
लॉकडाऊन मुळे रत्नागिरी मध्ये मंदिरे बंद आहेत. नुकतेच रत्नागिरीमध्ये मंदिरे उघडण्याकरिता घंटानाद आंदोलन देखील पार पडले. बघा ना जेव्हा मंदिरे सुरू होती ते दिवस किती सुंदर होते! मनाची शांती शोधण्याकरिता आपण थेट मंदिरात जाऊन देवासमोर बसून नामजप करू शकत होतो. मंदिरे सुरु असण्याचे म्हणजेच मंदिरांची दारे भक्तांसाठी कायम उघडी असण्याचे महत्त्व आपल्याला समजू लागले आहे असे मला वाटते. आता सध्या गाडीवरून जाताना व चालताना मंदिराला बंदिस्त करणाऱ्या कुलुपांकडे पाहून अंत:करण हळहळते. अशी कुलूपबंद मंदिरांची दारे अजून किती काळ पहायची आहेत जनतेने? सध्या मानसिक आणि अध्यात्मिक कुचंबणा झालेली आहे ती म्हणजे रोज देवळात जाऊन अपार श्रद्धेने भक्ती करणाऱ्या वृद्धांची! वृद्धापकाळामध्ये लोक देव धर्माकडे जास्त झुकलेली असतात व आपल्या जीवनाचे सार्थक करण्या करिता आपल्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच आध्यात्मिकतेच्या टप्प्यावर त्यांना साथ देतात, मनाला शांती देतात ती म्हणजे सध्या बंद असलेली मंदिरे! सध्या ६५ वर्षांवरील व्यक्तींनी जास्त घराबाहेर जाऊ नये असे शासन, प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे तर वृद्ध जणांची आधीच फार मानसिक होरपळ झाली.त्यामध्ये ही श्रद्धास्थाने बंद आहेत. सरकारला असं वाटत असेल की मोठी देवळे सुरू झाली तर भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतील व सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडेल आणि कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल. परंतु आता लोकांना भाव अनावर होत आहेत. या भीषण महामारी मध्ये लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील आघात झाले आहेत. विद्यार्थी युवक यांच्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने त्यांची मानसिक स्थिती बिकट झाली आहे.कडक सोशल डीस्टेंसिंग राबवून मंदिरे उघडल्यास या मानसिकरीत्या खचलेल्या जनतेला अध्यात्मिक व मानसिक स्थैर्य प्राप्त करण्याकरिता फार मदत होऊ शकेल. रोजचा कोरोना मुळे मृत पवणाऱ्यांचा आकडा वाढत चालला आहे तसेच रुग्णांची वाढती संख्या अजूनही लस उपलब्ध नसणे यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही आहे तसेच कोणाचा आधार देखील वाटत नाही आहे. अशावेळी लोकांची श्रद्धा ही फार महत्वाची ठरते लोकांच्या मनात सकारात्मक भाव निर्माण करू शकतात, मानसिक, आध्यात्मिक आधार व या स्थितिशी लढण्याची ऊर्जा प्रदान करू शकतात ती म्हणजे ही जागृत देवी - . देवतांची प्राणप्रतिष्ठित मंदिरे! तारणहार देवी-देवतांची पवित्र मंदिरे!आता आस लागलेय ती उघडण्याची!
हृषिकेश विश्वनाथ सावंत (पत्रकार) सचिव, लाईफलाईन फाऊंडेशन, रत्नागिरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा