कोरोनामुळे थांबलेली विकास कामे लवकर सुरु करा,मनसेचे लांजा तहसिलदारांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे लांजातील थांबलेली विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी यासाठी आज लांजातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लांजाचे तहसिलदार सौ.केळुसकर,तसेच उपअभियंता श्री अहिरे यांची भेट घेवून निवेदन सादर केले आहे.या निवेदनात लांजातील थांबलेल्या विविध बांधकामामुळे उद्धभवलेल्या समस्या मांडण्यात आल्या आहेत.
मार्च 2020 पासून लांजा तालुक्यातील अनेक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे.तर काही विकास कामे अर्धवट राहून दुरावस्थेत पडून राहीली आहे.या विकास कामांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सध्या लांजातील बाजारपेठेतूनच मुंबई गोवा हायवेचे काम चालू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन जाताना अनेक वाहनांना कसरत करावी लागत आहे. फेरिवाले,अनधिकृत पार्कींगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे लांजा बाजारपेठेतून होऊ घातलेला उड्डाण पुल लवकर व्हावा,यासाठी विविध विभागांना निवेदने देण्यात आली आहे.
लाकडाऊनच्या अगोदर लांजा तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत होती.काही कामे ग्रामपंचायतींमार्फत सुरु करण्यात आली होती.ही कामेही अर्धवट राहून गेली आहेत.अश्या कामांना वेग देवून होणारे नुकसान टाळावे असेही मनसेचे लांजा तालुका सहसंपर्क प्रमुख अनंत लक्ष्मण सुद (बाबू) यांनी सांगितले आहे.सदरचे निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष श्री सचिन साळवी,सचिव संदिप मेस्त्री,विभाग संघटक श्री राकेश पडियार,सागर मेस्त्री,अमित वीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा