माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचा भडे येथे शुभारंभ


विशेष सभेद्वारे केली जनजागृती 
गाव कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा ग्रामस्थांनी केलाय निर्धार 


लांजा ( दिपक मांडवकर)  देशभरात कोरोना प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम हाती घेतली आहे. सदर मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 15 ऑक्टोबर अखेर चालणाऱ्या या विशेष मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातील भडे येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. सरपंच सुधीर तेंडुलकर यांचे प्रभावी नियोजन अंमलबजावणी करण्याच्या कार्याचे उदघाटन माजी सरपंच शिवसेना शाखाप्रमुख संजीवकुमार राऊत यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी उपसरपंच सदिच्छा नवाथे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वासुदेव आग्रे, लक्ष्मण तांबे, आशा - अंगणवाडी सेविका, महिला बचतगट प्रतिनिधी आदि मोठया संख्येने उपस्थित होते. 
         ग्रामसेवक स्वाती महाजन यांनी कुटुंबाची जबाबदारी या नात्याने ग्रामपंचायत भडेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियानाची सविस्तर माहिती देऊन गावात कोरोना शिरकाव होऊ न देण्यासाठी पुन्हा एकदा एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करून कोरोना विरोधी लढा मोहीम तीव्र करण्याची गरज असल्याचे सांगितले. 
       गावात सुमारे साडेतीनशेहून अधिक चाकरमानी येऊनही कोरोना प्रतिबंध करण्यात आदर्श नियोजन करणाऱ्या भडे ग्रामपंचायतीने कोरोना लढा सन्मान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषित केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे उद्दिष्ट गाठून याही स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचा मनोदय भडेवासियांनी केला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी शांताराम दळवी, गीतानंद बोरकर, सदस्य संजय खर्डे, सुप्रिया गितये, जयवंती खर्डे, राजेश मयेकर, एकनाथ तोस्कर, अक्षता चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पण्या