वाडगावात गावकऱ्यांच्या मानपानावरुन वाद विकोपाला,लांजा प्रांताधिकाऱ्यांकडुन श्रीदेव धावबाच्या शिमगोत्सवावर बंदी
लांजा : तालुक्यातील वाडगाव येथील मधुकर पाटोळे आणि इतर आणि शेखर गोसावी व इतर या दोन्ही गटातील मानकर्यांमध्ये मानपानावरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लांजा प्रांताधिकारी यांनी वाडगाव येथील श्रीदेव धावबाच्या शिमगोत्सवाला वर बंदी घातली असून याठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 28 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत वाडगाव गावात 144 कलमान्वये निर्बंध जारी करण्यात आले आहेत. लांजा तालुक्यातील खावडी पाठोपाठ आता वाडगावमध्ये शिमगा उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे त्या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले आहे.
लांजा तालुक्यातील वाडगाव येथील मधुकर कृष्णा पाटोळे, श्रीधर कृष्णा पाटोळे, दत्ताराम गणपत कातकर व मंगेश बाळकृष्ण पाटोळे विरुद्ध शेखर सदाशिव गोसावी, ज्ञानेश लक्ष्मण गोसावी, गणेश गोसावी, शांताराम देवू गोसावी, गोविंद सदाशिव गोसावी या दोन गटातील मानकरी यांच्यामध्ये मानावरून सन 2009 पासून वाद सुरू आहेत. सन 2009 मध्ये मानकरी पाटोळे हे श्री सिद्धभैरी मंदिरात उपस्थित नसताना गोसावी समाजातील मानकर्यांनी श्री देव धावबाचा चा नारळ दिला होता. त्यानंतर श्री देव बाबा मंदिरात झालेल्या बैठकीत मानावरून तक्रारी झाल्या होत्या. त्या वेळी गावातील सर्व मानकर्यांनी प्रत्येकाने मान परंपरागत होते तशी ठेवून त्याप्रमाणे 23 फेब्रुवारी 2010 रोजी लांजा येथील दंडाधिकारी कार्यालय समोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते .
मात्र त्यानंतरही प्रथम मानकरी असलेले श्रीधर पाटोळे यांना सिद्धयोगी मंदिरात नारळ देण्यास गोसावी मानकरी मनाई करतात असा दावा मधुकर पाटोळे व गटाने केला होता. या दोन्ही गटातील मानकऱ्यांच्या मानापमानाच्या वादावरून लांजा तहसीलदार तसेच गाव पातळीवर बैठका घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र दोन्ही मंदिरात कार्यक्रम साजरा करण्यावर एकमत न झाल्याने व पार्टी नंबर 1 पाटोळे मानकरी यांना शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यास त्यावरून वाद होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची बाब लक्षात घेऊन लांजा प्रांत पोपट ओमासे यांनी श्री देव धावबाच्या शिमगोत्सवावर बंदी घातली आहे.
रविवार दिनांक 28 मार्च ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत वाडगाव गावात 144 कलम आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशान्वये वाडगाव गावात शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा