रत्नागिरी जिल्हा परिषदेवर धडकल्या हजारो अंगणवाडी सेविका
रत्नागिरी : (प्रतिनिधी) योगेश मुळे
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा संज्योक्ती सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील हजारो अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेवर धडकल्या. यावेळी अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून नावाजले जाते, पण महिलांचा सन्मान म्हणून सुमारे 2 लाख 8 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मोर्चाद्वारे मागणी करण्यात आली.
यां मागण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचारी मानून वेतनश्रेणी, भत्ते देणेची शिफारस केली आहे. म्हणून अंतरीम वाढ म्हणून तातडीने 12000 रुपये मानधन वाढ मिळावी. राज्यात सुमारे 4500 अंगणवाडी कर्मचा-यांना निवृत्तीवेतन सेवासमाप्तीनंतर मिळालेले नाही. त्यातील 1200 कर्मचारी निवृत्तीवेतनाची वाट पहात मरण पावल्या. दि. 29-03-2022 रोजी सरकारने 100 कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाला दिलेत, तरीही वरीलपैकी कोणालाही निवृत्तीवेतन देण्यात आले नाही, ते का अडवलेत याची चौकशी व्हायला हवी व निवृत्तीधारकांचे होणारे नुकसान त्यांचेकडून सक्तीने वसूल करून लाभार्थीना तातडीने ते मिळाले पाहीजे.
अंगणवाडी कर्मचा-यांची पदे कायद्याने निर्माण केलेली पदे आहेत. ते पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅज्युईटी मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे यापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व निवृत्तीधारकांना ग्रॅज्युईटी तातडीने देण्यात यावी. सध्या शासनाने दिलेले मोबाईल कालबाह्य झालेले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100 कोटी रुपयांची तरतूद नवीन टॅब देणेसाठी केली आहे. परंतू 6 महिने होत आले. अद्याप नवीन मोबाईल दिले गेले नाहीत. नवीन मोबाईल देण्याकरीता 10 हजार रुपये अंगणवाडी, सेविकांचे खात्यात द्यावेत आणि तिस-या वर्षी दुरुस्ती खर्च 3000 रुपये द्यावा. तसेच दरमहा पेन्शन द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत
या आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरीतून संज्योक्ती शिंदे, लांजातून पुष्पा शेट्ये, राजापूरातून किशोरी पारकर, संगमेश्वरातून प्रज्ञा केतकर, चिपळूण येथून सीमा हुमणे, खेड येथून शुभांगी मोरे, दापोलितून रेखा गोरे, गुहागरमधून सारिका हळदणकर तर मंडणगड येथून चित्रा कदम यांचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा