शिवभोजन थाळीवर बंद होणार ? अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण घेणार आढावा
मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
शिवसेनेच्या वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत राज्यभर शिवभोजन थाळी सुरू केली होती. कोरोनासारख्या संकटकाळातही लोकांच्या पुढे जेवणाचे ताट मांडत महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीच्या निमित्ताने लोकांचे आशीर्वाद मिळवले होते. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना आता बंद होण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी । पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण आता या योजनेचा आढावा घेणार आहेत. या थाळीचा लाभ सामान्यांना योग्यरित्या मिळत नाही, असा नव्या सरकारचा दावा आहे.
शिवभोजन थाळी केंद्रचालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान मिळते. सध्या राज्यात १ लाख ८० हजार शिवभोजन थाळ्यांसाठी परवानगी आहे. त्यातील १ लाख ४० हजार थाळ्या दररोज खाल्ल्या जातात. महाविकास आघाडी सरकारने थाळ्यांची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या योजनांचा रवींद्र चव्हाण आढावा घेणार आहेत. या बैठकीत खरेच या योजनेचा फायदा होतो का, हे तपासले जाणार आहे. त्यात उत्तर नकारार्थी मिळाले, तर ही शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा