डोंबिवलीत टिळकनगर मध्ये चोरट्या शिक्षिकेला अटक.
डोंबिवली : प्रतिनिधी
डोंबिवलीतील टिळकनगर मधील एका महिलेच्या घरात कुर्ता बदलण्याचा बहाणा करुन येऊन घरातील तीन लाख १९ हजाराचा ऐवज एका शिक्षिकेने लंपास केला आहे. मंगळवारी सकाळी सात ते आठ वेळात ही घटना घडली आहे. या चोरट्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.
कविता सागर गुधाटे (४१, रा. मातृश्रध्दा सोसायटी, टिळकनगर, डोंबिवली) असे तक्रारदार नोकरदार महिलेचे नाव आहे. अमिषा नीमेश अशेर (३८, रा. दीप्ती नवल सोसायटी, जिजाईनगर, डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेने सोन्याचे ६७ हजार ५०० रुपये, २७ हजार, ९० हजार, एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे जवाकिसु, बांगड्या, झुमका, सोनसाखळी, सोन्याचे कडे चोरुन नेले आहेत, अशी कविता गुधाटे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, शिक्षिका अमिषा अशेर या मंगळवारी कुर्ता बदलण्याचे निमित्त करुन सकाळी सात वाजता कविता गुधाटे यांच्या घरी आल्या. एका खोलीत ती कुर्ता बदलत असताना तिने तक्रारदार कविता यांच्या घरातील कपाटातील सोन्याचा ऐवज चोरला. अमिषा निघून गेल्यानंतर कविताने काही कामानिमित्त कपाट उघडले. तेव्हा तिला धक्काच बसला. तिला कपाटातील तिजोरीतील सोन्याचा तीन लाखाचा ऐवज गायब असल्याचे दिसले. आपण घरात असताना, चोरीची कोणतीही लक्षणे दिसत नसताना ऐवज गेला कोठे. असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शिक्षिका अमिषा हिनेच ही चोरी केली असण्याचा संशय व्यक्त करुन कविताने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करुन शिक्षिका आमिषाला अटक केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा