कोकणातला भंगारचोर नेता कोण? बंद कंपन्यांमधलं ३ कोटींचं भंगार गायब!

खेड : प्रतिनिधी (सैफ चौघुले)

खेडच्या लोटे एमआयडीसीमधील बंद कंपन्यांचं भंगार चोरी प्रकरणी स्थानिक पुढाऱ्यांसह ८ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद असलेल्या दोन कंपन्यांचं तब्बल ३ कोटी रुपयांचं भंगार चोरण्यात आलं. याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. हा भंगारचोर स्थानिक नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसीमध्ये तीन वर्षांपूर्वी इंडीड्यूट केमिकल्स आणि विशाल झिंक इंडस्ट्रीज या दोन भल्यामोठ्या कंपन्या होत्या. काही कारणांमुळे या कंपन्या बंद झाल्या, पण या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची यंत्र सामग्री होती. कोकणातल्या भंगार माफियांची या कंपनीवर नजर पडली.

भंगार माफियांमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचाही समावेश असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक वैभव आंब्रे यांनी पोलीसांकडे तक्रारही दाखल केली होती, पण कुणीही या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

रातोरात दोन बंद कंपन्यांमधील सांगाडे आणि यंत्रसामग्री कापून नेणं हे काही साधं सोपं काम नाही, पण पुढाऱ्याच्या आशिर्वादाने भंगारचोर मोकाट सुटले आहेत. या भंगारचोर पुढाऱ्यामुळे उद्योजकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

टिप्पण्या