भाजपचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे यांच्यासोबतच या माजी नगरसेवकांचा प्रवेश करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाकरे गटाला पुढील आठवड्यात मोठा धक्का बसण्याच्या चर्चांना जोर आला आहे.

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फोडण्यास आतापर्यंत शिंदे गटाला अपयश आले असले तरी पुढील आठवड्यात शिंदे गटाला नाशिकमध्ये मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे पोस्टर लावल्याने चर्चांना जोर आला आहे. येत्या सोमवारी (दि. २८) शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला जाणार असूनस सिडको, सातपूर व पंचवटीतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाचे नियोजन केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नाशिकमध्ये एक खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले असले तरी संघटनात्मक पातळीवर शिंदे गटाला यश आले नाही. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यावर नाशिकमधील पक्षविस्ताराची जबाबदारी असली तरी या तिघांमधील संघर्षामुळे ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक वेटिंगवर आहेत. ग्रामीण भागात ठाकरे गटाला धक्का देण्यात शिंदे गटाला यश आले असले तरी नाशिक शहरात मात्र ठाकरे गट अद्याप मजबूत आहे. प्रवीण तिदमे आणि श्यामकुमार साबळे वगळता ठाकरे गटातून कोणीही शिंदे गटात गेले नाही. पंधरा दिवसांपूर्वीच आमदार कांदे यांनी शिंदे गटात आलेल्या पदाधिकाऱ्यांवरून भुसेंना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे भुसेंनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत नाशिकमध्ये ठाकरे गटाला डॅमेज करण्याचे नियोजन केले आहे. ठाकरे गटात नाराज असलेले सुमारे डझनभर नगरसेवक सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे यांच्यासोबतच या माजी नगरसेवकांचा प्रवेश करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाकरे गटाला पुढील आठवड्यात मोठा धक्का बसण्याच्या चर्चांना जोर आला आहे.


टिप्पण्या