छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कुणा एकाचा कधीच असू शकत नाही. तो एकाच वेळी सगळ्या रयतेचा असतो ; योगेश मुळे.
संगमेश्वर: प्रतिनिधी
एका चित्रफीतीच्या माध्यामातून लोकांना वारंवार रस्त्यावर येण्याचे आवाहन करणार्या पत्रकार निखिल वागळेंचे डोके ठिकाणावर आहे काय? छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर आगपाखड करणार्या वागळेंनी आपल्या भ्रष्ट कारकीर्दीचे सिंहावलोकन करावे. आणि मग छत्रपतींचे नाव घेण्याची आपली नैतिक पात्रता पडताळून पहावी. छत्रपती शिवाजी महाराज हा कोणाचा कॉपीराइट विषय नाही. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता यांचे चित्र रंगवतानाच पराकोटीचा सावरकरद्वेष त्यांच्या या चित्रफितीमध्ये पहायला मिळतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करताना त्यांच्या जिभेवरील ताबा सुटला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे अन्य सहकारी यांच्यावरील टिप्पणी तर सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारितेला काळिमा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. आणि त्यांना व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना उत्तम राजकीय समज आहे. त्यामुळे अजून तरी त्यांच्यावर वागळेंसारख्या संधीसाधू पत्रकारांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.
ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आज गोडवे गाण्यात धन्यता मानत आहात त्याच शिवसैनिकांनी आपल्या कार्यालयात घुसून यापूर्वी आपणास शिवप्रसाद दिल्याचे विस्मरण झाल्याचे जाणवत आहे. शिवाजी महाराज हा विषय राजकीय बनवण्याचे महापाप वागळेंसारखे बेताल लोक करत आहेत. आम्हीही मराठी आहोत; आम्हालाही आमच्या महान महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे. परंतू आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत, "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.... माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे..." त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय अस्मिता ही आमच्यासाठी सर्वोपरी असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि त्यामुळेच संविधान आणि संवैधानिक पद यांचा सन्मान करणे हे आम्ही राष्ट्रीय कर्तव्य समजतो.
बोलघेवडे वागळे नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करतात. त्यानंतर अराजक पसरल्यास त्याची जबाबदारी घेणार का? त्यावेळी हेच पुन्हा सरकारच्या नावे कोल्हेकुई सुरू करतील. अहो निषेध नोंदविण्याचेसुद्धा संवैधानिक मार्ग आहेत. खरच स्वतःला मराठी, महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाईक म्हणवून घेत असाल आणि शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य जिव्हारी लागले असेल तर जाहीर आमरण उपोषण करून सत्याग्रह करा. राज्यपाल महोदय जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत अन्नपाणी त्यागा. छत्रपती शिवरायांसाठी एवढे तर करू शकता ना?
पण फक्त तोंडाळ असलेल्या वागळेंना एका विचारसरणीवर टीका करायची होती आणि त्यातूनच त्यांना सवंग प्रसिद्धी प्राप्त होते. त्यामुळे हा आक्रस्ताळेपणा त्यांनी केला असा माझा निष्कर्ष आहे. त्यामुळे वागळे साहेब आपल्या मर्यादा वेळीच ओळखा. एकच सांगतो "जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर महाराज सह्याद्रीच्या कुशीतून रोज उगवणार! छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कुणा एकाचा कधीच असू शकत नाही. तो एकाच वेळी सगळ्या रयतेचा असतो."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा