सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव विराजमान;धामणसे गावाला लागणारा निधी मिळवून देऊ;अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीमध्ये भाजपप्रणित पॅनेलने संघर्ष करत, सर्वांना सोबत घेत, कठोर मेहनत घेत घवघवीत यश संपादन केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हे तत्व अंगी बाणवत एकोप्याने गावाचा विकास करूया. त्यासाठी लागणारा निधी देऊ. राज्यात व देशात भाजपाचे सरकार असल्याने निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

धामणसे ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित पॅनेलचे सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडून सत्ता काबीज केली. या सर्वांचा सत्कार समारंभ श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या डी. एम. जोशी सभागृहात झाला. त्यावेळी अॅड. पटवर्धन बोलत होते. या वेळी नूतन माजी पंचायत समिती उपसभापती किसन घाणेकर, नेवऱ्यातील कौशल मोरे, सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव, भाजपा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी धनावडे, अनघा जाधव, रेश्मा डाफळे, दीपक रेवाळे, ऋतुजा कुलकर्णी, रत्नेश्वर महिला पतपेढीच्या अध्यक्षा वैष्णवी रहाटे आदी उपस्थित होते.

सरपंच अमर रहाटे यांनी परखडपणे गावची स्थिती सांगितली आणि सत्ता कशी आणू शकलो हे विस्तृतपणे सांगितले. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी विरोधकांच्या चुकीच्या प्रचारामुळे आमच्या पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्याच वेळी पुन्हा भाजपाची सत्ता आणू, अशी ग्वाही उमेशशेठना दिली होती. पाच वर्षे काम करत राहिलो, कोरोना काळात मदत केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साऱ्या जनतेला मोफत धान्य दिले. केंद्राच्या योजना गावात आणण्यासाठी प्रयत्न केले. समाजाचे नाव पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडल्याने भाजपचा विजय झाला.

गावासाठी विकासकामे करायची आहेत. आता गावात सत्ताही आहे, त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याकरिता आम्ही प्रयत्न करू, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ, अशी ग्वाही धामणसेचे सुपुत्र व सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी दिली. याप्रसंगी सदस्य ऋतुजा कुळकर्णी यांनी मनोगतामध्ये गावच्या महिलांसाठी चांगले उपक्रम राबवण्याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक माजी सरपंच अविनाश जोशी यांनी व सूत्रसंचालन माजी उपसरपंच मुकुंद जोशी यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थांची गर्दी झाली होती

या वेळी भाजपातर्फे कमळ सन्मान देऊन गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित केले. यामध्ये विजय सांबरे, चंद्रकांत गोताड, सोनू कांबळे, हरिश्चंद्र बनकर, विनायक भुवड, विश्वास धनावडे, वामन रेवाळे, विजय लोगडे, विश्वास इरमल, विश्वास रहाटे, श्रद्धा शितप आदींचा समावेश होता. तसेच निवडणुकीत विजयासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांनाही गौरवण्यात आले. रत्नेश्वर महिला पतपेढीच्या अध्यक्षा वैष्णवी रहाटे यांचाही सत्कार केला.


टिप्पण्या