कोळंबे सोनगिरी गावातील सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत विकासासाठी आमरण उपोषण?

देवरुख : प्रतिनिधी

सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी मागील कित्येक महिने कोळंबे सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेमार्फत कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना  भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सदर संघटनेचे पदाधिकारी श्री.महेश रसाळ , श्री राजेंद्र टाकळे , श्री.प्रणिल पडवळ, श्री.महेश पडवळ तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद कार्यालय , पंचायत समिती कार्यालय व स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी असणारे ग्रामपंचायत कार्यालय यांना वारंवार निवेदन देण्यात आले परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.

सरकारी काम आणि सहा महिने थांब या वाक्यप्रचारानुसार फक्त कागदपत्रे एका विभागीय कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात स्थलांतर होते परंतु प्रत्यक्षात वरिष्ठ कार्यालयातून कोणतीच कारवाई होत नाही त्यामुळे सदरच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक अजूनही विकासात्मक दृष्ट्या उपेक्षितच राहिले आहेत.

 आरोग्य, शिक्षण , मुबलक पाणी , वीज , शासन मंजूर घरकुले , व्यवस्थित रस्ते , समाजातील दुर्बल व अपंग घटकांना मदतीचा हात आणि इतर बाबी सर्वसामान्य नागरिकांना मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे परंतु शासन दरबारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आजपर्यंत जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधी तसेच त्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी वर्ग यांच्याविरोधात सदर संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्याचे हाक दिली  आहे.

टिप्पण्या