पट्टीचा चालक, पण गाडी चालवतानाच घात; गावकऱ्यांसाठी धावणारा निलेश गावी जातानाच मृत्युमुखी


 रत्नागिरी/गुहागर: प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावरती गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी काहीजण गुहागरच्या हेदवी गावातील होते. त्यामुळे काल अपघाताची बातमी येताच हेदवी गावावर शोककळा पसरली. येथील एका वाहन चालकाचा बळी गेला आहे. निलेश शशिकांत जाधव मुंबईमध्ये वाहन चालकाची नोकरी करायचा. गेल्या अनेक वर्षांपासून निलेश मुंबईत काम करत होता. निलेश गाडीचे भाडे घेऊन मुंबईला गेला होता. तिथून परत येत असताना हेदवी गावातील जाधव, डावखोतमधील पंडित कुटुंबीयांसह आणखी काही लोक त्याच्या गाडीत होते. परंतु, गावी परतत असताना या सगळ्यांना वाटेतच मृत्यूने गाठले.


निलेश जाधव हेदवी गावातील जुळेवाडी पन्हाळगड येथे राहत होता. या अपघातामुळे जाधव कुटुंबातील एकुलता एक मुलगा हिरावला गेला आहे. निलेशचे वडील शशिकांत जाधव गवंडी काम करतात. निलेशच्या पश्चात आई-वडील व छोटी बहीण असा परिवार आहे. चालक म्हणून गावातल्या अनेकांना उपयोगी पडत होता. हेदवी येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले होते.


गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी निलेश मुंबईहून गावी परतला होता. पुढील काही महिने तो गावातच राहिला. दोन वर्षांपूर्वी त्याने गावात टेम्पोचा व्यवसाय सुरु केला होता. परंतु, हा व्यवसाय फारसा न चालल्यामुळे काही दिवसांपूर्वीच निलेश मुंबईला परतला होता. निलेश उत्तम चालक व गावातील अनेकांना उपयोगी पडणारा तरुण होता. त्याच्या जाण्याने हेदवीतील मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.


टिप्पण्या